कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव;विठ्ठल कुबडे व अमोल फडतरे यांना राष्ट्रपती पदक!
स्त्रीशक्ती न्यूज
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कर्तव्यदक्ष,प्रामाणिक आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पकर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव; विठ्ठल कुबडे व अमोल फडतरे यांना राष्ट्रपती पदकडला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विविध विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्रे व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारार्थींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे उपअधीक्षक श्री. दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक श्री. अविनाश रोकडेराव शिळीमकर, एसआरपीएफ गट क्रमांक–१ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रदीप साहेबराव सानंतु, तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त श्री. विठ्ठल कुबडे यांचा समावेश होता.
याशिवाय श्री. महेंद्र कोरे, श्री. अमोल फडतरे आणि उपअधीक्षक श्री. अनंत माळी यांनाही त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी गौरवण्यात आले. आपल्या कर्तव्यनिष्ठेने, शिस्तबद्ध कार्यपद्धतीने आणि जनतेशी असलेल्या संवेदनशील नात्यामुळे या अधिकाऱ्यांनी पोलीस दलाची प्रतिमा अधिक उज्ज्वल केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे सहायक पोलीस आयुक्त श्री. विठ्ठल कुबडे आणि श्री. अमोल फडतरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले. हे पदक मिळणे ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून, संपूर्ण पोलीस दलासाठी गौरवास्पद क्षण असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर पाहुणे, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशीच प्रामाणिक सेवा सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
या गौरवसोहळ्यामुळे पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)