कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात;सेवा बँक बचावाची लढाई उभारली!

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात;सेवा बँक बचावाची लढाई उभारली!

प्रथम सभासद मेळावा; सेवा विकास बँक बचाव कृती समितीची स्थापना

पिंपरी:सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड, पिंपरीच्या सभासदांचा प्रथम मेळावा संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या मेळाव्यात बँकेच्या पुनरुज्जीवनाची जोरदार मागणी करण्यात आली. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा विकास बँक बचाव कृती समिती’ स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची एकमुखाने निवड झाली. 

मेळाव्यात कामगारनेते यशवंतभाऊ भोसले, माजी संचालक अशोक दखनेजा, व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज व नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२५ मध्ये बँकेतील बहुमतातील कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीमध्ये दाखल झाले. त्यानंतर लिक्विडेटरकडून झालेल्या अन्यायाबाबत माहिती मिळाल्यानंतर संघटनेने अप्पर कामगार आयुक्त Pune कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. बँक बंद करताना किंवा कर्मचाऱ्यांना कमी करताना शासनाची परवानगी घेतली होती की नाही, याची चौकशी मागवण्यात आली. तपासात लिक्विडेटरने शासनाची कोणतीही परवानगी न घेता २०५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आणि काही विभाग बंद केल्याचे उघड झाले.

या तक्रारीवरून शासकीय कामगार अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून अधिकारी येणार असल्याचे समजताच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकीत वेतनापैकी आठ ते दहा टक्के रक्कम जमा केल्याची माहितीही समोर आली आहे.

मेळाव्यात सर्व सभासदांनी बँक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या वेळी सेवा विकास सहकारी बँक बचाव कृती समितीच्या स्थापनेचा ठराव अशोक दखनेजा यांनी मांडला व जोगदंड यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदी एस. बी. ओहाळ यांची निवड देखील एकमुखाने करण्यात आली.

कृती समितीच्या वतीने–रिझर्व्ह बँकेने रद्द केलेला परवाना पुन्हा बहाल करण्याची

  1. लिक्विडेटरची नियुक्ती रद्द करून बँकेचा ताबा पुन्हा सभासदांना देण्याची 
  2. २०५ कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेऊन तीन वर्षांचे थकीत वेतन देण्याची 
  3. अशी तीन प्रमुख मागणी असलेले ठराव मंजूर करण्यात आले.

सेवा विकास बँकेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, ही बँक इतर कोणत्याही वित्तीय संस्थेत विलीन न करता मूळ रूपातच सुरू ठेवण्याचा ठरावही संमत झाला.

सभासद, व्यापारी, ठेवीदार व नागरिकांना कृती समितीच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारीही सभासदांनी स्वीकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले