शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!
स्त्रीशक्ती न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक प्रमोद कुटे यांनी मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरील प्रभावी नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा पक्षासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रमोद कुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून, शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रवेश सोहळ्याला राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी सभापती अजीत गव्हाणे, माजी सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक विठ्ठल नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर, सामाजिक कार्यकर्त्या फहमिदा जावेद शेख, तौहिद शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रमोद कुटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल आणि संघटन अधिक बळकट केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रमोद कुटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने मैदानात उतरण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात आणखी काही स्थानिक नेते पक्षप्रवेश करू शकतात, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)