पिंपरी-चिंचवडमधून दुष्काळग्रस्त भागासाठी लोकमान्य प्रतिष्ठानची मदत

पिंपरी-चिंचवडमधून दुष्काळग्रस्त भागासाठी लोकमान्य प्रतिष्ठानची मदत

स्त्रीशक्ती न्यूज 

पिंपरी–चिंचवड:आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक नगरींपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिक आज आधुनिक सुखसुविधांनी परिपूर्ण जीवन जगत आहेत. उद्योग, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या संधींमुळे हजारो कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. या प्रगत वातावरणात समाधानी जीवन जगताना, महापुरांनी आणि अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण भागातील जनजीवनाचे चित्र पाहून शहरातील नागरिकांच्या मनात वेदना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव पुन्हा जागी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी, महापूर आणि पाणीपुरवठा संकटाने परिस्थिती गंभीर झाली आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरे उद्ध्वस्त झाली, तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. वृत्तपत्रांमधील छायाचित्रे, टीव्हीद्वारे प्रसारित होत असलेल्या दृश्ये आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या दु:खद बातम्या पाहून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या भावनाही भारावल्या. संकटात अडकलेल्या “आपल्या मातीतील” लोकांसाठी काहीतरी करण्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.

याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकमान्य प्रतिष्ठान, राजे शिवाजी नगर यांनी पुढाकार घेत एक प्रशंसनीय निर्णय घेतला आहे. शारदीय नवरात्र उत्सव आणि त्यानंतरचा दसरा सण हा परिसरातील अत्यंत उत्साहाचा काळ मानला जातो. परंतु या वर्षी परिसरातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखत एकमताने दसऱ्याची मिरवणूक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या संकल्पनेनुसार, उत्सवासाठी वापरावयाची आर्थिक तरतूद दुष्काळग्रस्त व पुरबाधित भागातील लोकांच्या मदतीसाठी वळविण्यात आली. त्यानुसार ₹21,000 ची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली. ही मदत श्री तेजस हिंगे यांच्या मार्फत मा. नगरसेवक तुषार हिंगे यांच्या स्वाधीन करण्यात आली.

संकटाचा सामना करत असलेल्या कुटुंबांना ही मदत थोडासा आधार देईल, असे मत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. “आपण प्रगत भागात राहतो म्हणजे जबाबदारी संपत नाही; आपल्या मातीतील लोकांवर संकट आल्यास आपण उभे राहिलेच पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये अशाप्रकारे समाजमन एकत्र येऊन केलेली मदत ही सामाजिक संवेदनशीलतेची व बांधिलकीची जिवंत परंपरा पुढे नेणारी ठरली आहे.