पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवर खासदार अमोल कोल्हे यांचे विशेष लक्ष!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – भोसरीतील पदाधिकाऱ्यांची खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
स्त्रीशक्तीन्यूज
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोसरी विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या बैठकीत संभाव्य आघाड्या, निवडणूक रणनीती आणि उमेदवारांच्या निवडीवर सविस्तर चर्चा झाली. भोसरी विधानसभा क्षेत्रातील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपल्या अपेक्षा, मतदारसंघातील परिस्थिती आणि निवडणूक लढवण्यावरील भूमिका कोल्हे यांच्यासमोर मांडल्या.
बैठकीत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले,
“लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील भोसरीतील पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालणार आहे. शहरात सत्ताधाऱ्यांकडून झालेला भ्रष्ट कारभार आणि गैरव्यवहार जनतेसमोर आणणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
ते पुढे म्हणाले,
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लाखोंच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रचंड पाठिंबा दिला आहे. त्या मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरणार आहे.”
या शिष्टमंडळाचे नेतृत्व युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी केले. उपस्थितांमध्ये माजी नगरसेविका प्रियंका बारसे, युवक प्रदेश पदाधिकारी राहुल पवार, भोसरी विधानसभा अध्यक्ष अॅड. संतोष शिंदे, उद्योजक विजय चौधरी, युवक उपाध्यक्ष प्रशांत काळेल, समाजसेवक गिरीश वाघमारे, शिवसेना अल्पसंख्याक नेते मुनाफ तरासगार आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले,
“पक्षातील विभाजनानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे. त्यांच्याशी न्याय करण्याची आणि योग्य सन्मान देण्याची जबाबदारी पक्षाची आहे.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोसरीतील प्रभागांमध्ये मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत आणि खासदार अमोल कोल्हे व शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील.
लवकरच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जस्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




Comments (0)
Facebook Comments (0)