२०० सीसीटीव्ही तपासून घरफोडी करणारी सराईत टोळी जेरबंद; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

२०० सीसीटीव्ही तपासून घरफोडी करणारी सराईत टोळी जेरबंद; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
२०० सीसीटीव्ही तपासून घरफोडी करणारी सराईत टोळी जेरबंद; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

स्त्रीशक्ती न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढत २९ लाखांचा सोन्या-चांदीसह मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २४ तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी, तसेच दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणात चोरीचे दागिने विकत घेणारे सराफ व मध्यस्थांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे सनीसिंग पापसिंग दुधानी, जलसिंग राजपुतसिंग दुधानी आणि मनीष बाबूलाल कुशवाह अशी आहेत. तर चोरीचे दागिने खरेदी करणारे किरपाणसिंग शितलसिंग दुधानी, शांताराम उर्फ संतोष गुरप्पा कांबळे आणि अक्षय राजू चनाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी बंद घरांचे कुलूप व कोयंडा तोडून घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी परिसरातून चारचाकी वाहन चोरून, त्याच वाहनातून रावेत परिसरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जुन्या पुणे–मुंबई महामार्गाने लोणावळ्याच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर १२ जणांचे विशेष पथक तयार करून सोमटने फाटा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. घरफोडीनंतर चोरीच्या वाहनातून जात असताना पोलिसांनी वाहन अडवून आरोपींना अटक केली.

चौकशीत या टोळीने शहरात १२ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोनकडून सुरू आहे